रिपब्लिकन कार्यकर्ते व नेत्याचा अहंकार ?
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील दलित शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणारया समाजाचा हा राजकीय पक्ष आहे. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.
शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.त्याच्या महापरी निर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाई ची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या एतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल. त्यामुळेच रिपाई आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द झाले आहेत.स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.आज ही यावरच यांची संपूर्ण इमारत उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर डी भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आत्तापर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.
आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्या मुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली "व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येउच शकत नाही ?" अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण झाली.प्रा.जोगेंद्र कवाडें सारखा प्रामाणिक नेता खासदाराचा मागच्या दराने आमदार झाला.आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला.रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमखी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्स्त झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल एक पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी 'प्रबुध्द भारत' मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता. त्यात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन, आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, 'हा पक्ष देशातील सर्व दलित, पिडीत आणि शोषित जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल. अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल. शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान, ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा. पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृतीमधिल प्रतिक तर, अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते. त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती,पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद,अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर, दिशाहीन बनत गेले. गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.आज आमचे काही दैनिक आहेत पण त्या दैनिकाच्या संपादकाचे आंबेडकरी चळवळी बाबत कोणत्याही विषयावर एक मत होत नाही.राजकीय नेत्या सारखे ते एकमेकाच्या जवळ बसून किमान एक कार्यकार्म बनवून समाजा समोर भूमिका मांडण्याची हिंमत दाखवत नाही.मग समाजातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन कोण करेल ?.
१९२७ ते १९५६ पर्यंत दलित शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनि यर नव्हता.आंबेडकर चळवळ संपली या छोट्या पुस्तकात लेखक बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐक्यासाठी उपोषण करणारे कोण आहेत आणि त्याचे शिक्षण व रोजगार काय आहे हे नांवासह दिले आहे.सर्व असंघटीत कामगार मजूर होता हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही.रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल.अहंकार, मतभेद, प्रलोभन, आमिषापायी आंबेडकरी चळवळी तील सामाजिक, राजकीय निष्ठा गौण ठरत आहे. आज आपला सामाजिक, राजकीय पाया काय आहे ? ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर,चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय ?.
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे ? पक्षाची राजकीय मान्यता, निवडणूक चिन्हही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत. अत्याचार, भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण करणार आहोत? राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत. आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना, आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय, सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर???...
राजकारण कशासाठी, कोणासाठी आणि का करायचे ? ३ ऑक्टोबर २०१५ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ५८ वर्ष पुर्ण होत आहेत.गेल्या आठदिवसा च्या वृत्तपत्रातील बातम्या पाहिल्या तर काही रिपाई गटाची मान्यता रद्ध करण्यात आल्याचे वाचण्यात येत आहे.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे.मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. म्हणून सर्व गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी प्रथम आपल्यातील अहंकार सोडून दयावा आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.सर्व नेत्यांना भीमटोला मारून भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या वर्धापन दिना निमित्य एक संकल्प करूया आणि रिपाई अहंकार मुक्त करून नवा इतिहास घडवूया

बरोबर आहे सर
ReplyDelete