Sunday, February 7, 2021

विज्ञान अज्ञान सब का मालिक एक

 विज्ञान अज्ञान सब का मालिक एक 

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा" राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा २०२० शिर्डी येथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.तेव्हा या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक माणसाची सबका मलिक एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुप्रसिद्ध साई मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची उत्सुकता होती.देशभरातुन विदेशातुन लोक साई दर्शनासाठी येतात.अनेक शहरांतून साई भक्त तरुण महिला पायी चालत येतात.त्यामुळे देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात जाऊन येणे योग्य ठरेल, कारण लोक अज्ञानी अंधश्रद्धा मानणारे असले तरी लाखोंच्या संख्येने लोक तिथे जाऊन माथा टेकवितात ते सर्वच अशिक्षित, असंघटित अंधभक्त नाहीत तर अनेक लोक वेल एज्युकेटेड, सुरक्षित ठिकाणी नोकरी करणारे आणि गाडी,बंगला, नोकरचाकर असणारे,उद्योगपती,बिल्डर शासकीय अधिकारी, शासकीय ठेकेदार, अनेक पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक, सर्वच प्रकारची माणसं श्रद्धा सबुरी ठेऊन दर्शनासाठी येत असतात.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला पण आनंद वाटतो.लोकं लांबलांबून दर्शनासाठी येतात. योगोयोगाने आलो आहोत तर मंदिर परिसर पाहता येईल व दर्शन घेता येईल.म्हणूनच मी पण मित्रमंडळीसह पत्नी, मुलगा,सून,भाच्यासोबत गेलो.

मंदिराच्या परिसरात प्रसादाची दाटीवाटीने विविध साहित्याने सजलेली दुकाने आहेत.प्रत्येक दुकानासमोर माणसं उभे असतात,या इथे चपला, बूट काढा,मोबाईल ठेवा प्रसाद घ्या,फ्री आहे सर्व असे सांगतात पण तसे वागत नाही. लाडू,पेढा,साखर फुटाणे,मुरमुरे,अशा प्रकारचे वेगवेगळे पाकीटे हार,फुले,चादर ट्रे घालून हातात देतात. ते मंदिरात नेण्यास सक्त मनाई असते.तरी ते घरी नेण्यासाठी घ्या, मित्रमंडळीस वाटण्यासाठी घ्या अशी विनंती प्रत्येक दुकानदार करीत असतो. प्रसादात प्रत्येक व्यक्ती चपला बूट,मोबाईलचे वीस ते तीस रुपये लावले जातात. त्यासाठी कोणीच सहसा वाद विविध करीत नाही.कारण देवाच्या दारात भाव कसा करावा.विज्ञान अज्ञान सब का मालिक एक अशी मानसिकता असते.

मंदिरात प्रवेश घेण्यासाठी एन्ट्री पास घ्यावा लागतो. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत,एन्ट्री पास कुठून?. किती वाजता?.दिनांक,स्त्री पुरुष हे कॉम्प्युटर वर चेकिंग करून प्रवेश दिला जातो. विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर केला जातो. सुरवातीला दिवसभरात सात हजार लोकांना प्रवेश दिला जात होता.आता पंधरा हजार लोकांना प्रवेश दिला जातो. शिर्डी एसटी डेपो मध्ये एक पास देणारे केंद्र आहे तिथे दिवसभरात साडेतीन हजार लोकांना प्रवेश पास दिल्या जातात. दुसरे केंद्र मंदिराच्या बाजूलाच आहे, त्यात ही साडेतीन हजार लोकांना प्रवेश दिला जात असतो. लॉक डाऊन संपल्यामुळे भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे दोन्ही केंद्रात पंधरा हजार प्रवेश पास दिल्या जातात.अशी माहिती हॉटेल मॅनेजर यांनी सांगितले.

मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शनासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. त्यामुळे आजारी असलेल्या भक्तांनां,गरोदर माता, वयोवृद्धांना,लहान पांच सहा वर्षांच्या मुलामुलींना प्रवेश दिला जात नाही. तरी काही पालक सुरक्षा रक्षकांसोबत वादविवाद करतात आणि प्रवेश मिळवितात.रांग सुरू झाली की कोणाला मध्ये बसु दिल्या जात नाही. मुख्य सिंहासन जवळ साईबाबा मूर्तीसमोर माथा टेकविण्यास सक्त मनाई असते.हात जोडून दर्शन घेऊन पुढे जाण्यास सतत सांगितले जाते.तीस सेकंद किंवा एक मिनिट सुद्धा थांबू दिल्या जात नाही. तरी भक्तांची श्रद्धा तुसभर ही कमी होत नाही. दानपेटीत दान टाकणारे भक्त सढळ हस्ते दान टाकत असतात.तर दुसरीकडे दान,देणगी देणाऱ्यांसाठी अनेक खिडकीतून रीतसर नांव नोंदणी करून पावती देण्याची उत्तम व्यवस्था केली असते.तरी चोरापासून सावधान असे सर्व मोख्याच्या गर्दीच्या ठिकाणी लिहलेलं असते.

शिर्डी नगर पंचायत सर्वात श्रीमंत असावी कारण शिर्डी शहर प्रसिद्ध पर्यटन स्थळ, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे, या शहरात हॉटेल लॉजिनिंग मोठ्या संख्येने आहेत. घोटी मार्गे शिर्डीला  येतांना रोड चांगले आहेत.परंतु हायवे सोडून शिर्डीत प्रवेश घेतला की तीन चार किलोमीटर रोड अतिशय खराब आहे. त्या रोड वरून शिर्डीत प्रवेश घेतला की कोण जागृत व कोण झोपलेले आहे.श्रीमंत देवस्थान व्यवस्थापण की नगर पंचायत ते कळत नाही. 
मंदिर परिसरात अपंग,वयोवृद्ध बाई,माणसं भिक्षा मागणारे खूप मोठ्या प्रमाणात दिसतात.तर मंदिराच्या आत हटेकट्टे निरोगी परंतु मेंदूने अपंग असलेले तीन साडेतीन तास रांगेत उभे राहून भिक्षा मागतांना दिसतात.ज्यांच्या धडावर स्वतःचे डोके नाही असेच लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. विज्ञानाच्या कक्षा किती झपाट्याने वाढत असल्या, तरी मेंदू असलेल्या माणसांच्या मनांवर वामनाच्या तीन पावलांचे नियंत्रण कमी होतांना दिसत नाही. डोळे,तोंड,कान बंद ठेऊनच इथे वावरावे लागते. विज्ञान अज्ञान सब का मालिक एक म्हणावे लागते.
इतर कोणत्याही धर्माच्या प्रार्थना स्थळात म्हणजे चर्च, मस्जिद,गुरुद्वारा,बुद्ध विहार,आग्यारी,जैन मंदिरात देवाच्या मूर्ती समोर हात जोडून माथा टेकवत येतो. जो ज्यावेळी येईल जिथे जागा मिळेल तिथे बसून किंवा उभे राहून प्रार्थना करतो.त्यांना शिस्त शिकविण्यासाठी सुरक्षा रक्षक नसतात. आचरणाचे संस्कार त्यांना लहानपणा पासुन दिल्या जातात. त्यामुळेचं ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर त्यांचे ते आचरण करतात.हा मोठा आचरणातील संस्कारातील अभाव मला या "सबका मलिक एक"  ठिकाणी जाणवला.
 मुंबई वरून शिर्डीला पायी चालत जाणारे अनेक तरुण मोठ्या उत्साहात जातांना दिसतात. स्मार्टफोन ने फोटो कडून मित्रमंडळीस शेयर करतात.सिन्नर पर्यत शरीरात एक जोश असतो सिन्नरच्या पुढे पुढे अनेकांची शारीरिक स्थिती खूप दुःखदायक कष्टमय झालेली दिसते.काहींच्या पायाला कपडे गुंडाळलेले तर काहीनां दोन सहकारी आधार देऊन चालवत असतांना दिसतात. मंदिर परिसरात गेल्यावर ही काही तास आराम केल्याशिवाय दर्शन घेणे अशक्य असते, कारण मंदिरात भक्तानां रांगेत जाण्याची व्यवस्थाच अशी केली असते की तो सरळ साईबाबांच्या समोर जाऊ शकत नाही. तरी अशी एकूण परिस्थिती असतांना ही बहुजन मागासवर्गीय समाजातील गोरगरीब कष्टकरी लोकांची मानसिकता कमी होतांना दिसत नाही.श्रध्दा सबुरी ठेऊन विज्ञान अज्ञान सब का मालिक एक म्हणावे लागते.सबका साथ सबका विकास होतांना दिसत नाही. लांबून आलेल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर होत असतांना मंदिर परिसरात अपंग,वयोवृद्धांना निराधार मुलामुलींना गंध लावून का जगावे लागते, त्यांच्या शारीरिक आणि आर्थिक समस्या का सुटत नाही. असा प्रश्न मला पडला म्हणूनचं हा लेख प्रपंच केला, कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देश नाही. विज्ञान आणि अज्ञान दोन्ही हातात हात घालून यशस्वीपणे पुढे जात आहे की मागे नेत आहे यांचा विचार व्हावा यासाठी जे सत्य परिस्थिती दिसली ती मांडण्याचा प्रयत्न केला.विज्ञान अज्ञान सब का मालिक एक 

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,उभांडुप मुंबई,


No comments:

Post a Comment