Friday, August 28, 2020

कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !

 कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !

आपल्या श्रमाने देशाचे उद्योग व्यवसाय उभे करणाऱ्या, प्रचंड फायद्यात आणणाऱ्या स्थलांतरित मागासवर्गीय, कामगारांना रेल्वे प्रवास नाकारणारे मोदी गरिबांचे शत्रू ठरले. याच मोदींनी उच्चवर्णीय ऐतखाऊ, कर्जबुडव्या उद्योगपतींना, 68 हजार कोटींची कर्जमाफी केली. मनुस्मृती प्रणित मागासवर्गीय  जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात ज्यांनी वॉट्सप, फेसबुक या सोशल मीडियावर, कष्टकऱ्यांच्या बाजूने लीहिले ते संविधानिक शहाणे ठरले. कोरोना आडून 85 टक्के मागासवर्गीय भारतीयांना जगणे असह्य करणाऱ्या मोदींच्या अंधभक्तीने थाळ्या वाजविणारे,  मेणबत्त्या पेटविणारे  सध्याच्या जागतिक वातावरणात मूर्ख ठरले आहेत.
  अमेरिकन अध्यक्ष असलेल्या ट्रम्प तात्यांना गुजरात मध्ये आणून स्वतःच्या हुकूमशहा वृत्तीचे ब्रँडिंग बनवू पाहणाऱ्या मोदींनीच, खऱ्या अर्थाने कोरोनासाठी पायघड्या घातल्या होत्या. स्वतःच्या पाप कृत्यास, पुण्यकर्म ठरविण्यासाठी तब्लिकी मुस्लिम आणि वरळी कोळीवाड्यातुन कोरोना प्रसार होतोय असे धादांत खोटा दिशाभूल करणारा गोबेल्स नीतीचा प्रचार प्रसार मोदी मीडियाने भरभरून केला. 
   मोदींच्या अमेरिकन ट्रम्प कार्डची जागतिक विश्वासार्हता  आता संपली आहे... जागतिक स्तरावर मोदी आणि ट्रम्प हे भूमीपुत्रावर अन्याय करणारे वर्णभेदी मनुवादी नेतृत्व आहे, हेच सत्य कोरोनामुळे समोर आले आहे. विज्ञानवादी अमेरिकेत मोदींचे भारतीय शेटजी भटजी उद्योगमित्र आजही अन्यायाचीच बाजू उचलत आहेत. त्यामुळे  मनुस्मृती समर्थक भाजपने आता ट्रम्प सारख्या अत्याचाऱ्यांना सोबत घेऊन मनुस्मृतिस आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारित आणि संघटित केले आहे. 
    कोरोनाच्या जागतिक महामारीत मोदींसारख्या नेतृत्वाची मानवतेच्या जीवनमूल्यांवर परीक्षा झाली. त्यात मोदी नापास झाले तेही अमेरिकन अध्यक्ष मित्राला घेऊनच! आज अमेरिकेस "नो जस्टीस नो पीस" या भूमिपुत्र आंदोलनाने घेरले आहे. जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत अमेरिका शांत नाही. जॉर्ज फ्लाॅईड या मूळ भूमिपुत्र अमेरिकन (काळ्या) अर्थात आपल्याकडे मागासवर्गीय माणसाला (गोऱ्या) उच्चवर्णीय पोलिसाने निर्दयपणे मारले. याविरोधात अमेरिकन व्हाइट हाऊस समोर गगनभेदी निदर्शने जनता करीत आहे. मोदी मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना जमिनीखाली बनविलेल्या भुयारात अर्थात पाताळात लपून बसावे लागतेय. भूमिपुत्र अमेरिकन माणसावर अन्याय झाला म्हणून तेथील उच्चवर्णीय सुद्धा भूमीपुत्रासाठी एकत्र लढत आहेत ही अमेरिकन लोकशाहीची अभिमानास्पद गोष्ट भारतात अत्यन्त दुर्मिळ आहे.  
    रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृती दहन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काही उच्चवर्णीयांनी अशी साथ दिली होती. परन्तु आज अमेरिकेत नोकरीसाठी गेलेले अनेक उच्चवर्णीय भारतीय, मोदीप्रमाणे ट्रम्प तात्याच्या सोबत आहेत. अमेरिकन पोलिसांनी गुढघे टेकून आंदोलकांची माफी मागितली आहे .भारतीय पोलिसांना जनतेच्या सेवेसाठी हा मोठा आदर्श ठरावा.. कोरोना च्या आडून आणलेल्या बेरोजगारीमुळे, शहरे सोडून गावाकडे पायी निघालेल्या कामगारांच्या अतोनात हाल अपेष्टा, रेल्वे खाली चिरडून झालेले अमानुष मृत्यू यांना मोदीच जबाबदार असताना भारतात मात्र अशी आंदोलने होत नाहीत. येथे मना मनात जो मनुवादी विषमतावादी विचार पुराणे, रामायण, महाभारत या महाकाव्यातून बिंबविला गेलाय त्यात कष्टकरी भूमिपुत्र (शूद्र)ओबीसी यांच्या जीवाला काही किंमत नसते. त्याची संपत्ती आणि जीव याचे काय करायचे हे ठरविण्याचे सर्वाधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे असतात. असे मनुस्मृती सांगते. अमेरिकेत मनुस्मृतीच्या तोडीचा ग्रंथ लिहिणारा विचारवन्त महापुरुष(?) झाला नाही. त्यामुळेच तेथे शांती नाही. 
     त्यामानाने मोदी खरोखरच महान आहेत. नोटबंदीत शेकडो लोक रांगेत उभे राहिल्यामुळे चक्कर येऊन तर हजारो गरिबीच्या चरख्यात चिरडून मेले. कोरोनात गरिबीमुळे, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मूळ भूमिपुत्र मागास जनता (काळे) मरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याच पावलावर पावलं टाकत मोदी भारतीय मागासवर्गीय माणसांना आरोग्याच्या सुविधा नाकारण्याची युक्ती वापरून मारणार नाहीत ना? अशी भीती निर्माण झालीय!.
    जगात सार्वजनिक आरोग्य सेवा नेहमी उपेक्षित शोषित यांनाच लागतात. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. श्रीमंतांना खाजगी दवाखाने कुठेही उपलब्ध असतात. गरिबीचे हे जागतिक सत्य जाणून जगातले सारे राज्यकर्ते गरीब जनतेसाठी मोठं मोठी हॉस्पिटल्स बांधतात. आमच्या कडे मंदिर  निर्माणाच्या प्रचारानेच सत्ता मिळते त्यामुळं मंदिर अर्थशास्त्र हाच इथल्या मोदिसत्तेचा गाभा आहे. मोदींच्या नियोजनशून्य नोटबंदी आणि लाॅकडाऊनमुळे भारतात होणारे मागासवर्गीय गरीबाच्या हत्या, अत्याचार यांच्या विरोधात लिहिणारे खरोखरच वीर पुरुष आहेत. 
     अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड प्रमाणे त्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये अशी विनंती या सर्वांच्या वतीने मी मोदींना करतोय. पारधी हत्याकांडात मारले गेलेले मागासवर्गीय हे भारतीय पोलिसांच्या कडून नाही तर परंपरागत भारतीय मनुस्मृतीच्या क्षत्रिय सेवेमुळे, हे देखील नम्रपणे कबूल केले पाहिजे. सरकारी पोलीस खात्याने कोरोनाच्या काळात प्राणही गमावलेत अनेक ठिकाणी त्यांनी लोकांना मदतही केलीय. मी त्यांना धन्यवाद देऊन हे सांगेन भारतातल्या मागास जॉर्ज फ्लॉईडला तुम्ही कधी मारू नकाच, परन्तु कोणी स्वयंघोषित पोलीस बनून (क्षत्रिय) अवतार घेऊन मारत असेल तर निष्क्रिय होऊ नका हे संविधानाचे तत्व आम्हास जगायचंय. 
     सामाजिक शोषणात धार्मिक आधार घेऊन अत्याचार करण्यात मनुवादी भारत कुप्रसिद्ध आहे. येथील भूमीपुत्रानी आपल्यावरील अन्याया विरोधात बोलू नये, लिहू नये म्हणून त्यास मनूने शिक्षणच नाकारले होते. ते सावित्रीमाई फुले यांनी दिले. तो तहानेने व्याकुळ झाला तरी पाणी उच्चवर्णीयांनी नाकारले होते; ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आरक्षण शिक्षण नाकारले ते राजर्षी शाहू महाराज यांनी दिले. मागासवर्गीय भूमिपुत्र यांच्या या लढ्यात सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, तेहतीस कोटी देवही नाहीत त्यामुळं बहुसंख्य लोक मागासांच्या बाजूने नाहीत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे लढणारे एकटे पडले, दुर्मिळ झाले. विचार मात्र संपले नाहीत, चक्क अमेरिकेतूनही पुढे येऊ लागले. सुरुवातीस बोटीचा प्रवास नंतर विमानाचा आणि आता सोशल मीडियाच्या मनाचा वेग साऱ्या शोषितांना जगाबरोबर क्षणात जोडत आहे. 
     कोरोनाच्या नावे वरळी कोळीवाड्यातील भूमिपुत्र आगरी कोळ्यांना बदनाम करताच तेथील मातृसत्ताक महिला विजेसारख्या कडाडल्या.त्याने आदित्यही ढगाआड गेला. मासेमारीस गेलेल्या ओल्याचिंब भगिनींना उठाबशा काढायला लावणाऱ्या, अपमानित करणाऱ्या पोलिसांना जयेश आकरे या तरुणाने समाज जागवून वठणीवर आणले. एकंदरीत उच्चवर्णीयांच्या सर्व प्रकारच्या शेतीस ऊस कारखान्यास प्रोत्साहन देणाऱ्या सरकारने कोकणातील मासेमारी कोरोनाच्या काळात उध्वस्त केली आहे. कोळीवाडा गावठाणात जमिनी लुटून मस्त झालेले भूमाफिया बिल्डर युतीने आता भूमिपुत्रांना जमिनीचा सातबारा शिल्लकच ठेवला नाही. त्यामुळे मोदींचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज भूमिपुत्रांना मिळणे अशक्य आहे. जेवण सुरू आहे आणि ताट वाटी च नाही, उद्योग व्यवसाया साठी आवश्यक जमिनी विना भूमीपुत्राची ही केविलवाणी अवस्था झालीय.    
    जगभरच्या शोषितांना आपल्या संविधानिक हक्कांसाठी जागविणारी अमेरिकन आंदोलनाची आग आता भर वादळात अरबी समुद्राच्या उसळलेल्या लाटांना लागलीय, समुद्रही पेटलाय!! आगरी कोळी कोरोनाच्या या बंदिवासात बोलू लागलाय. नवी मुबंई विमानताळात आगरी कोळी कराडी तरुण रुपेश धुमाळ, गौरव म्हात्रे, किरण केणी, प्रेम पाटील, किरण पवार, राज पाटील, डाऊर सर यांच्या तरुण नेतृत्वाखाली लढतोय. रायगड ठाणे नवी मुबंई, मुंबई येथे विविध पक्षात आगरी कोळी ओबीसी राजकीय नेते असूनही अत्याचार वाढतच होते. महाराष्ट्राच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षात ओबीसी नेत्यांनी गुलामी स्वीकारल्यामुळे भूमीपुत्राचा आवाज दाबण्यात आला. मच्छिमार प्रकल्पग्रस्त पुनर्वसना पासून वंचित राहिले परन्तु ठेकेदार नेते मात्र शेठ होऊन बसले. नवी मुबंई च्या गावठाण चळवळीने तरुणाईमध्ये नवं चैतन्य भरले. आज ठाणे रायगड मुंबई या ओबीसी पट्ट्यात ओबीसी तरुण सामाजिक स्तरावर संघटित झाल्यामुळे लोकांचे लक्ष उच्चवर्णीयांचे गुलाम झालेल्या राजकीय नेतृत्वास बाजूला सारून समाजाच्या कामात पुढाकार घेत आहेत ही आशेची गोष्ट आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक प्रश्नाबाबत मुका असलेला सागरपुत्र आता बोलू लागला. कोरोनाच्या काळातही भूमिपुत्र स्पीकस च्या सोशल मीडियावरील चर्चेने आता लढाईचे रणशिंग फुंकले गेले. राबोडी कोळीवाडा ठाणे येथील उच्चशिक्षित मनीष चंद्रकांत वैती आणि वेसावे कोळीवाडा येथील उद्योजक विकास मोतीराम कोळी यांनी विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाची महाचर्चा घडवून आणली. यात डॉ शेखर ओझा, डॉ अजय नाखवा, श्रीमती तेजस्विनी गलांडे, राजहंस टपके, डॉ हर्षदीप कांबळे, सदानंद पवार  सहभागी झाले.
       सर्व समाजाच्या भलेपणाचा विचार करणारा बुद्धिमान वर्ग शोषितांना मागासवर्गीयांना जास्त गरजेचा असतो. भारतात सर्वच क्षेत्रात प्रगतीची नवं नवी शिखरे गाठणार-या बौद्ध बांधवांनी हे सिद्ध केलेले सत्य आहे. अर्थात जागतिक कीर्तीच्या विद्वान असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने हे बदल घडलेत. जागतिक स्तरावर स्वतंत्र बुद्धीच्या बळावर अनेक समाज आणि राष्ट्र यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारतातील उच्चवर्णीय लोकांनी मागासवर्गीय बांधवांना ज्ञान शिक्षण आणि नव्या  संधी नाकारून प्रकाशाची दारे आणि खिडक्या ही बंद केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान आर्थिक सामाजिक राजकीय समतेच्या तत्वामुळे जे नवं नवे अधिकार मागासवर्गीय भारताला देत आहे तेही काढून घेणारे मोदींसारखे राज्यकर्ते पुन्हा मनुस्मृतीकडे देशाला नेत आहेत. अशातच एकत्र येऊन उद्योग विकासाच्या ज्ञानाची चर्चा घडविणारे ओबीसी तरुण ही नव्या भारताची आशा आहे. गुलामीचा धर्म सांगून तर्क बुद्धीचे मार्ग बंद करणारी देव देवळे यांना कुलपे लागली आहेत. देवळातील पैसा माणसाच्या उपयोगात येत नाही हे पाहून निराश माणसे स्वतःच्या बुद्धीचे बंद दरवाजे स्वतःच उघडीत आहेत!  हे जग परिवर्तनशील आहे हे सांगणाऱ्या मातृसत्ताक एकविरा पुत्र बुद्धाचे  युग येणार हे तर सांगत नाहीत? 

राजाराम पाटील, 8928452112,उरण रायगड
ओबीसी संघर्ष समन्वय समिती.महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment