Friday, August 28, 2020

कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!

 कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!  

जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच 'नजरकैदेत' असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत.. अंत्यत्ययात्रेतला 'शेवटचा' निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली  घटना आम्ही 'उरणकर' अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे नकोच .. अगदी मयताच्या किंवा सांत्वन सोहळ्यासाठीही नको .. असे  'शहाणपण' अनुभवलेले आम्ही!वाढदिवस कसा साजरा करू शकतो?होय तरीही केला आम्ही साजरा एक वाढदिवस! तोही सोशल मीडियावर मुद्दाम, जाहीरपणे सांगण्यासारखा!* 

 *माझ्या बालपणात मी यात्रा जत्रा पालखी सोहळे, शेकडो सण उत्सव यातच मोठा झालो. दरवर्षी मोठ्या उत्साहात चैत्र पौर्णिमेला साजरी होणारी हनुमान जयंती, गणेशोत्सव, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती सोहळे, सत्यनारायण पूजा, हळदी लग्नसोहळे  यांच्याबद्दल 2005 नंतर मात्र, मागे वळून पाहण्याचा सिंहावलोकन करण्याचा दुर्लभ क्षण माझ्या जीवनात आला.

        आगरी कोळी ओबीसी समाजात जन्मलेल्या कुणासही विचार करायला लावणारी ही घटना आहे. अतिशय व्यस्त शहरी शिकवण्या आणि शिक्षकी पेशात असताना देखील गरिबीचे चटके सोसत, निराशेचे जगणे सुखाचा शोध घेतच होते. अचानक सुखाच्या ऐवजी संकटांचा, सामाजिक आघात अनुभवला! आणि मी अंतर्मुख झालो!!  आई वडिलांचे संस्कार नेहमीच आदर्शवादी होते. आईच्या कष्टमय जीवनास पाहून, शेती मासेमारी या व्यवसायी क्षेत्रात बालपणातच, शाळेतल्या शिक्षणापेक्षा मी अधिक वेगाने प्रगती करत निघालो होतो.. परन्तु खेळ व्यायाम आणि अभ्यास यात माझ्या वर्गात नेहमीच पहिल्या नंबरवर ही असायचो. असं असतानाही जेव्हा वयाच्या  35 वर्षी तुम्हास अपयश येते, तेही आयुष्याच्या मध्यावर ही फारच भयंकर कुणालाही निराश करणारी घटना ठरावी! नेहमी खरे बोलावे, चांगले  आचरण ठेवावे, नित्य देवपूजा, मोठ्यांचा आदर, व्यायाम करावा, दारू न पिणे, स्त्रियांचा आदर अशा अनेक चांगल्या सवयी असूनही जेव्हा अपयश वाट्यास येते तेव्हा आजच्या कोरोनासारखीच स्थिती मनात तयार होते. मनःसामर्थ्य दाता, बाबा बुवा,  नवसाला पावणारा ईश्वर  देव, देवळे आणि धर्मही दुःखी मनास, निराश मनास आधार देत नाही. तेव्हा कुणी दारूची बाटली जवळ करतो! जी कोरोनाच्या संकटकाळी आमच्या केंद्र आणि राज्य शासनानेही स्वीकारली!  त्याचे अनुकरण सामान्य माणूसही करतो. व्यसनाने मन शांत होते, झोप लागते हे ही गैरसमज!! उपाय कमी पडले म्हणून आज वस्ती आणि गावात किमान एक  "आत्महत्या" होतेय. आणि सत्ताधारी जातींच्या नियोजनातून उपेक्षित गरीब कोरोनाच्या दुप्पट वेगाने मरतोय.
       मला दारू, मनाची निराशा आणि मानवी अन्याय अत्याचार मारू शकत नव्हते. ही माझ्या आई वडिलांची पुण्याई! तरीही जी काही निराशा होती, ती काही आंबेडकरी भावांनी घालविली. त्यात नवी मुंबईचे अशोक अंकुश, प्रा प्रेमरत्न चौकेकर, शाहीर संभाजी भगत ही नावे अत्यन्त कृतज्ञताा  पूर्वक मी घेईन. या तिघांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 'विचार' मला दिला आणि पाठीवर बंधुत्वाचा 'हातही' दिला. लोकहो इथूनच साऱ्या सण उत्सवाची  मनोमन चिकित्सा सुरू झाली... आर्थिक अपयश, ब्राह्मणी रागाने गेलेली नोकरी,  गरिबी यातूनच जीवनाकडे पाहण्याचा खराखुरा नैसर्गिक, दृष्टीकोन तयार झाला. मित्र फार मोलाचे ठरले. 
       मी आंबेडकरी विचारामुळेच 2006 च्या आगरी कोळी कराडी भूमीपुत्राच्या "रिलायन्स सेझ" विरोधी लढ्यात चिरनेर येथे, लोकनेते दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात लढलो. 'आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी' या माझ्या जातीच्या संघटनेचा जन्मच अशोक अंकुश या आंबेडकरी माणसाने घातला. हे सांगायचे कारण म्हणजे अनेकांना वाटते आंबेडकरी विचारामुळे, चळवळी मुळे लोक स्वतःचा समाज, गाव, परिवारास विसरतात. या आरोपात तथ्य नाही.
        व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन कसे जगावे हे आंबेडकरी भाऊ बहिणींनी मला शिकविले. यानंतर सिडको विरोधी आंदोलनाचे दुसरे नेते दि बा पाटील मला भेटले. राजकीय जीवनात आमदार खासदार आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष पदी पोहचलेल्या या दोन्ही नेत्याच्या जीवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि एकविरापुत्र बुद्ध ओतप्रोत भरले होते. वर्तमान राजकीय अपयश अनुभवणा-या  ओबीसी नेत्यांसाठी, समजून घेण्यासारखे,  अभ्यासण्याजोगे हे कटू सत्य आहे. या दोन महान, उत्तुंग आगरी नेत्याच्या माध्यमातून मी खोती विरोधी शेतकरी चळवळ, चवदार तळे पाणी हक्क चळवळ, चिरनेर जगल सत्याग्रह, मनुस्मृतीदहन यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी पेरलेले माझ्या समाजाचे "उत्कर्षबिंदू" अभ्यासले.
         आज व्यक्तिगत जीवनातील सुख शांती खुशी आणि सार्वजनिक जीवनातील उभारी 2005 ते 2020 या 15 वर्षाच्या छोटेखानी झंझावाती कालखंडात, सुरुवातीच्या जीवनातील आर्थिक अपयशाचा शिक्का मी पुसून टाकला. बिकट झालेला रायगडच्या लोकसभेचा बंद दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न आज मी करतोय. रायगड जिल्ह्यात दि बा पाटील यांच्यानंतर घातलेली दिल्ली बंदी अधिक मजबूत करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जमीनदार खोत बुवा बापू यशस्वी झालेत. 
         "दोनच राजे इथे जाहले !! या कोकण पुण्यभूमीवर.. एक त्या रायगडावर! एक चवदार तळ्यावर..!" आंबेडकरी चळवळीतील हे लोकप्रिय गीत, मला छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंचित रयतेची, मागासवर्गीय भारताची, दिल्लीवर राजकीय स्वारी करण्याची संधी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनीच  दिलीय. ओबीसींच्या जीवनातील हा आंबेडकरी राजकीय विचार हा असा सहज रुजलाय.
        आई एकविरा ही बुद्धाची आई आहे हे जागतिक इतिहास शास्त्रीय पुरातत्वीय संशोधन पुण्याच्या प्रा विजय गायकवाड, अण्णा त्रिभुवन, भन्ते विमलकीत्ती याच्या सहवासात घडलेली बेलापूर पीपल्स एज्युकेशन मधील छोटीशी घटना, आज जगाला हुंडा नाकारणाऱ्या महान एकविरा मातृसत्ताक संस्कृतीकडे घेऊन जात आहे, जीचे मूळ मोहेंजोदडो येथील प्राचीन नदी किनारे, सागर किनारे आणि आजच्या कोळीवाड्यातील समृद्ध स्त्री संस्कृतीकडून कार्ला एकविरा बौद्ध लेण्यातून, नवी मुबंई विमानतळात उध्वस्त होणाऱ्या, 2000 वर्षे जुन्या सम्राट अशोकाच्या, मातृसत्ताक केरुमाता लेणी बचाव आदोलनाची क्रांतिकारी शिकवण, आगरी कोळी कराडी ओबीसी समाज बांधवांना देतेय.
          आज देशाची सत्ता मनुवादी मोदींच्या हाती असून स्त्री शुद्रातिशूद्र शेतमजूर कामगार मच्छीमारांच्या भारतास अत्यन्त भयानक मरण यातना देत आहे. 2005 पूर्वीच्या माझ्या जीवनातील अनुभव आजच्या कोरोना घरबंदी सारखेच होते. ओबीसींची मनातील भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. "देवांनी मैदान सोडलंय..?" ती साऱ्या देशाची व्यथा कोरोनाकाळातच व्यक्त झालीय! माझ्या वाचनात अशी पोस्ट आलीय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतही कुठंतरी कुजबुजले, 'मुझे "धर्मने "निराश किया...!'  या साऱ्यांचा अर्थ एकच! आज माणसाला माणूस आणि माणुसकीच वाचवू शकते..  
            इथूनच पहिल्या भारतीय माणसाची जयंती सुरू झाली असावी ! त्या महामानवाचे नाव "डॉ बाबासाहेब आंबेडकर"! मानवी कर्तृत्वाचा उत्सव करण्याचा प्रामाणिक पणा शिवजयंती, महात्मा  जोती सावित्री जयंती कडून, आम्ही आता आता आगरी कोळी ओबीसी नेते दि बा पाटील दत्ता पाटील या आमच्यातील कर्तृत्वान माणसाच्या जयंत्या साज-या करून करतोय. बौद्ध लेण्यांच्या जागतिक अभ्यासातून आई एकवीरेंच्या जन्माची तारीख आणि आई वडिलांची नावेही आम्ही शोधलीत! तीही एक माणूस आहे! देवी नाही!! एका शस्त्रहीन, अहिंसक प्रेमाने जग जिकणा-या, महान विरास जन्म देणारी एकविरा आई आहे. 
        आज देव नाकारून अनेक कर्तृत्वान, हुशार माणसे आंबेडकरी चळवळीने जन्मास घातली; शिक्षण आणि बौद्ध विज्ञानवादी संस्काराने घडविलेली. मी या  सर्वांची नावे येथे घेत नाही. परन्तु नवी मुबंई विमानतळ आणि मुबंई गावठाण हक्क, जमीन हक्क लढे लढत असताना संपर्कात आलेले आंतरराज्य आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील  कोरोनाग्रस्त गरीब माणसांना, प्रसिद्धी पासून दूर राहून, गुप्तपणे अन्नदान देणाऱ्या अनाम वीरांना मी धन्यवाद देईन. अर्थात त्या दानाची गरज, या क्षणापासून वाढत जातेय.. याचीही जाणीव करून देत देतच.. मी एका मोठ्या मनाच्या माणसाचा ..डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस घरी राहून साजरा केला. अर्थात धम्म, धान्य दानाने..!!केवळ राजकीय नेतृत्वच लोकांना न्याय देऊ शकते, हा माझा गोड गैरसमज दूर करणारे माझे आदर्श, आयएएस अधिकारी, महाराष्ट्राच्या उद्यागो विभागाचे सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी!. या अगोदर मा किशोर गजभिये, मा आर के गायकवाड यांच्यासारख्या एकापेक्षा एक हुशार अधिकाऱ्यांना मी भेटलोय त्या सर्वांची नावे घेणे जागेअभावी शक्य नाही. मानवी कर्तृत्वाचा आंबेडकरी पराक्रम लिहिण्यास जागा अपुरी पडावी! हा संदेश देणारी  आंबेडकरी बौद्ध धम्म चळवळ ही जगातील डाव्या आणि उजव्या चळवळीचा मेंदू आणि मणका यांना नवं मानवतेचा संदेश देणारी जागतिक चळवळ ठरावी! माझ्या मनातील याच विचारांमुळे, आजच्या कोरोनाच्या अंधारातही दिवा पेटवायची इच्छा असेल, तर तो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाच्या आदर्शचाच असावा. डॉ हर्षदीप कांबळे यांनी प्रचंड संघर्षातून शिक्षण घेऊन देशासाठी जे योगदान दिलेय तो माझा आणि ओबीसी समाजाचाही आदर्श ठरावा यात मला अजिबात शंका वाटत नाही. "मुक्ती कोण पथे" या मार्गावर माझ्या जीवनात, जागतिक बौद्ध धम्म परिचय, विनयशीलता, दान पारमीता या जीवन मूल्यांचे संस्कार  आणि उद्योगाचेही जागतिक मार्ग खुले करणारे ठरले.
        कोळीवाडे आणि गावठाणे यांच्याशी सरकारच्या विविध विकास योजना जोडणारे डाॅ हर्षदीप कांबळे सागरपुत्र ओबीसी समाजातील उद्योजक तरुणास अनुकरणीय आहेत. थायलंडच्या बौद्ध उपासीकेशी विवाहबद्ध होत जातीअंत लढ्यातील आंतरजातीय, आंतरदेशीय विवाहांना नवा आदर्श  देणारे दांपत्य म्हणून जागतिक कौतुकास पात्र आहेत. सत्ता संपत्तीचा कौटूंबिक, खानदानी(उच्चवर्णीय) मोह टाळण्यासाठी स्वतःचे मूळबाळ जन्मास न घालता साऱ्या देशातील जगातील अनाथ, उपेक्षित, मागासवर्गीय बालकांना वात्सल्य देणाऱ्या या महान पतीपत्नीना मी कोरोनातही शुभेच्छा दिल्या नाही तर, ती कृतघ्न पणाची मोठी चूक होईल.
        आज साऱ्या जगात राजकीय नेतृत्वाला लोक संशयाने पाहत आहेत. देशबंदी शहरबंदी, गावबंदी, घरबंदी आणि माणसाने माणसाला  भेटण्यासाठी घातलेली बंदी, मोदिवादी नव अस्पृश्यता याची तपासणी नागरिक करू लागलेत. या संकट समयी साऱ्या जगालाच नवी मानवी मूल्ये देणारी एकविरापुत्र बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडर यांच्या सारखी कमळपुष्पे या खंडप्राय मातृसत्ताक भारतमातेला हवीत. त्या मानवी मूल्यांचा आदर्श देणारे अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे हे माझ्या दर्या किनाऱ्यावरील घरी भात मासे खाऊन गेले .. म्हणूनच बंधुत्वाचा अधिकाराने हे लिहिले... स्वतः त्यांनी आणि कुणीही यास "व्यक्तिपूजा" समजू नये.

राजाराम पाटील  मो 8928452112,उरण.रायगड
अध्यक्ष:आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी       

No comments:

Post a Comment